Tuesday, 24 November 2015

संविधान




२६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वातंत्र देशाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान प्रधान केले. भारत देशाच्या प्रत्येक नागरिकांच्या घरा घरात भारतीय संविधान पोहचले पाहिजे हा उदात्त हेतू घेऊन आम्ही बरेच वर्षापासून कार्य करीत आहोत आणि त्या बाबत जनजागृती शासनाने करावी अशी मागणी आम्ही वारंवार करीत आलो त्याला यश आले असुन तसे परिपत्रक काढले गेले आहे. त्यामुळे आम्ही मनापासून आभार व्यक्त करीत आहोत
                                                                                                                           अध्यक्ष
                                                                                                           प्रचार प्रसार प्रसिद्धी व माहिती संस्थान

Tuesday, 11 August 2015

चला अलिबागला...सरखेल कान्होजी आंग्रे जाणून घ्यायला...

सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख :
पर्यटन म्हटले की किल्ले, थंड हवेची ठिकाणे पाहणे... तेथे भेट देणे... आरामात मुक्काम करणे... आणि तेथून निघून येणे, एवढेच. पण आम्हास असे वाटते की, पर्यटनाला जरुर जा. तेथील किल्ले, समुद्र किनारे जरुर पहा आणि तेथील माहिती जाणून घ्या. आपण ज्या स्थळांना भेट देतो. तेथील इतिहास जाणून घ्या तरच ते खरे पर्यटन होऊ शकेल. शनिवार दिनांक ४ जुलै २०१५... अशाच एका शूरवीराचा हा स्मृती दिन. त्यानिमित्ताने जिल्हा रायगड, अलिबाग येथील सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या शौर्याचा, वीराचा हा इतिहास...


रस्त्याने अलिबाग हे मुंबईपासून अवघे १०० कि.मी. अंतरावर आहे. गेटवे ऑफ इंडियावरुन जलमार्गाने बोटीने अलिबागला पोहोचता येईल. रस्त्याने मात्र पनवेल-पेण-आणि अलिबाग असे अंतर सुमारे तीन तास प्रवासाने जाता येते. पनवेल-पेणहून अलिबाग हा चांगला रस्ता आहे. दोन्ही बाजुंनी हिरवीगार वनश्री. काजू, आंबा, फणस आणि विविध फुलांची झाडी याठिकाणी मन आकर्षून घेते. अलिबागला पनवेल-पेण रेल्वेने जाता येते. पनवेलपर्यंत लोकलने प्रवास करता येतो. तसा प्रवास सुखदायकच वाटतो. आपण अलिबाग शहरात बसस्थानकावर पोहोचलो की, अवघ्या ५ मिनिटाच्या अंतरावर सरखेल कान्होजी आंग्रे या शूरवीराची समाधी आहे. एकूण १० समाधी त्याठिकाणी आहेत. कान्होजी आंग्रे यांच्या मुख्य समाधीनंतर त्यांच्या कुटुंबातील आणखी मान्यवरांच्या समाधी याठिकाणी आपणास पाहावयास मिळतात. छत्रपतींच्या सुनबाई महाराणी ताराबाई यांच्या पश्चात कान्होजी आंग्रे यांच्या कार्याची प्रथम सुरुवात दिसून येते. बाळाजी विश्वनाथ पेशवे यांनी कान्होजी आंग्रे यांचे महत्व ओळखून त्यांना छत्रपती शाहू यांच्याकडे वळविले होते. सन १६९४ पासून कोकणात कान्होजी आंग्रे पराक्रमाने गर्जत होते.

राजाराम महाराजांच्यापासूनच कान्होजी उत्तम कार्य बजावत होते. कोकणची जहागीर मोघलांच्या जुलूमापासून जतन करण्यासाठी कान्होजींनी यश संपादन केले होते पण “सिद्धी” हा कान्होजींना त्रासदायक ठरत होता. ह्या सिद्धीने इंग्रजांची मदत घेतली आणि कान्होजी आंग्रे यांची सत्ता बुडविण्याकरिता प्रयत्न केले. पण कान्होजी आंग्रे यांच्यापुढे काहीही चालले नाही. आंग्रे यांच्या ताब्यात पुष्कळ प्रदेश व कित्येक किल्ले आहेत. त्यामुळे दर्यावर त्यांची भिती सगळ्यांनाच उत्पन्न झाली होती.

कान्होजी आंग्रे यांचा जन्मकाल उपलब्ध नाही. परंतु त्यांचा जन्म सन १६६९ च्या सुमारास झाला असावा. सन १६९४ मध्ये कान्होजींना सरखेल पदवी प्राप्त झाली होती. ते परिवारासह श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वराचे यात्रेस गेल्याचा उल्लेख मिळतो. कान्होजी यांचे बालपण जोशी-ब्राम्हण यांच्या घरी गुराखीपणाच्या चाकरीत गेले होते. त्यांनी १६९४ पासून १६९८ पर्यंत अवघ्या ४ वर्षांच्या काळात कोकणपट्टीतले एकूण एक किल्ले मोघलांकडून जिंकून आपल्या अंमलाखाली आणले होते. शिव छत्रपती शिवाजी महाराज यांचे चिरंजीव राजाराम यांनी कान्होजींना सुवर्णदुर्गावर नेमले. त्यांनी तेथून जंजिराच्या भागाकडे लक्ष दिले. काही किल्ले व ठाणी आपल्याकडे जिंकून घेतली. कान्होजींचा बांधा सुदृढ होता. पण ते अंगाने स्थूल होते. त्यांची मुद्रा भव्य होती. डोळे पाणीदार होते. ते आपल्याजवळील सरदारासमवेत अतिशय प्रेमाने वागत असत. त्यांच्या वागण्यात प्रेम वात्सल्य होते. पण त्यांची शिक्षा कडक असे. सन १६९८ मध्ये त्यांनी तळ कोकणचा बंदोबस्त उत्तमरितीने केला होता.

शंभुराजे यांच्या बलिदानानंतर मोघलांच्या अतिक्रमणापासून स्वराज्य संरक्षणाच्या उज्ज्वल काळात छत्रपती राजारामांना कान्होजी आंग्रे यांचे चांगले सहाय्य होते. छत्रपती राजाराम सन १७०० मध्ये सिंहगडावर मृत्यू पावले. पण तत्पूर्वीच कान्होजींनी 1697 मध्ये “कुलाबा” हे आपले मुख्य ठाणे केले होते. कोकण किनाऱ्याचे राजे म्हणून त्यांनी घोषणाही केली होती. राज्यात जमाबंदीला आरंभ केला होता. कान्होजी आंग्रे यांचे वडील तुकोजी आंग्रे होय. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांकडे उत्तम सेवा बजावली होती. शाहू महाराज आणि कान्होजी यांच्यामध्ये तह झाला. या तहाने 10 जंजिरे व १६ किल्ले कान्होजी आंग्रे यांना मिळाले होते. तसेच आंग्राची सत्ता कोकण किनाऱ्यावरील मांडवे ते त्रावणकोरपर्यंत पसरली. त्यामुळे शाहूराजे समाधानी होऊन त्यांनी बाळाजी विश्वनाथ यांना पेशवे पद दिले होते. शाहू छत्रपतीच्या दरबारात जंजीरकर सिद्दीच्या मोहिमेसंबंधात कान्होजी आंग्रेचा सल्ला घेण्यात आला होता. कान्होजींचे पश्चिम कोकण किनाऱ्यावरील वाढते यश, पोर्तुगीज, डच, फ्रेंच आणि विशेषत: इंग्रज यांना नकोसे वाटू लागले होते. त्यांनी संयुक्तरित्या कान्होजीबरोबर आरमारी लढाया केल्या होत्या. परंतु कान्होजीपुढे त्यांना अपयशच स्वीकारावे लागले होते. ब्रम्हेंद्र स्वामी धावडशीकर यांचा कान्होजी आंग्रे यांच्यासमवेत निकटचा संबंध होता.

कान्होजींची लष्करी व आरमारी सैन्याची शिस्त कौतुकास्पद होती. कान्होजींचे आरमार प्रबल होते. कान्होजींच्या आरमारामध्ये १५० पासून २०० टन वजनाची लढाऊ जहाजे व गलबते होती. ६ व ९ तोफाही होत्या. या प्रबळ आरमारावर निष्णात स्वामीनिष्ठ व संतोषी असे दर्यावर्दी लोकही होते. कोकण किनारा शत्रूपासून सुरक्षित ठेवण्याकरिता कान्होजींची नेमणूक छत्रपतींकडून व जास्त मान व सरखेल म्हणून अधिकृतरित्या केली गेली होती. म्हणून कोकण किनाऱ्याचे परकीय शत्रूपासून संरक्षण करणे हे कान्होजींचे कर्तव्यच होते, आंग्रे चाचे नव्हते. आंग्रे हे दर्यावरचे संरक्षक सत्ताधारी होते. कान्होजी आंग्रे यांचा मृत्यू मिती आषाढ वा.5 शके 1651 वार शुक्रवार दिनांक ४ जुलै १७२९ रोजी झाला. कान्होजी आंग्रे हे मनाने निर्मळ होते. स्वधर्मावर त्यांची जाज्वल्य निष्ठा होती. त्यांच्या सैन्यात यवन सरदारही होते. त्यांचे न्याय फैसले अत्यंत नि:पक्षपाती होते. त्यांनी एकूण ३६ वर्ष राज्य कारभार केला. ६० वर्ष त्यांना आयुष्य लाभले. उत्पन्न वाढवून त्यांनी राज्याला फायदा करुन दिला. प्रेम, वात्सल्य व ममता देऊन जनतेला सांभाळले. अलिबाग येथील नगरशेट मोदी, गुजर यांचे घराणे कान्होजींच्या वेळेपासून होते. बाहेरुन येणाऱ्या मालावर त्यांनी जकात बसविली. आपली स्वत:ची टाकसाळही सुरु केली. परमुलकी, वेसावे, केली लोकांची वसाहत श्रीबाग पेठ रामनाथ अलिबाग येथे आंग्रेनीच वसविली आहे. श्रीबागेतही एक समाधी आहे.

अलिबाग येथील त्यांच्या समाधीजवळ पत्नी मथुराबाई आंग्रे यांची समाधी आहे. कान्होजींना तीन पत्नी होत्या. मथुराबाई, लक्ष्मीबाई आणि गहिनाबाई. सेखोजी आंग्रे यांना तुकोजी, रायाची, आणि मावजी ही तीन मुले. तुकोजी यांचे कान्होजी आंग्रे हे पुत्र. कान्होजी मथुराबाई पत्नीपासून जयसिंग, संभाजी हे दोन पूत्र. लक्ष्मीबाईपासून मानाजी, तुकाजी दोन पूत्र आणि गहिनाबाईपासून येसाजी, धोडजी हे दोन पूत्र असे सहा पूत्र होते. लाईबाई नावाची एक कन्या असल्याचा उल्लेख सापडतो. श्री क्षेत्र आळंदी येथे कान्होजी आंग्रे यांची पत्नी लक्ष्मीबाई यांनी दीपमाळ बांधल्याचा शिलालेखात उल्लेख सापडतो.

कान्होजी म्हणजे मराठी राज्यांतील प्रसिद्ध मुत्सद्दी आणि धडाडीचे दर्यावर्दी सरदार कान्होजी आंग्रे होय. संभाजी महाराज, राजाराम महाराज यांच्या बिकट कारकीर्दीत कान्होजी आंग्रे यांच्या पराक्रमाने मोघलांना नकोसे होऊन गेले होते. राजाराम महाराज यांच्याकडून सुवर्णदुर्गावर नेमणूक झाल्यावर त्यांनी मराठेशाहीच्या पडत्या काळात पश्चिम किनाऱ्याचे संरक्षण उत्तमरितीने केले होते.

त्यामुळेच त्यांना ध्वजाधिकारी “सरखेल” इत्यादी किताब मिळाले होते. सरखेल म्हणजे आरमाराचा प्रमुख. मराठ्यांच्या आरमाराचे ते मुख्य अधिपती झाले. त्यामुळे इंग्रज, फिरंगी आणि यवनांचे कान्होजी आंग्रे यांच्यापुढे काही चालत नव्हते. कान्होजी यांनी धर्मस्थापना केली. मुंबईच्या ब्रिटीश गव्हर्नरास कान्होजी आंग्रे यांनी ठणकावून सांगितले होते की, आमचे राज्य जुलूम, बलात्कार, चाचेगिरी याच्यावर चालले आहे, असे म्हणणे तुमच्यासारख्या व्यापाऱ्यांना शोभत नाही. श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी चार बादशहाबरोबर लढाया केल्या. स्व-पराक्रमाने राज्य स्थापन केले. यानुसार आमच्या सत्तेला आरंभ झाला आहे. त्यानुसार आमचे राज्य टिकले आहे. याचा विचार तुम्हीच केला पाहिजे, असे ते ठणकावून इंग्रजांना म्हणाले होते.

आपण अलिबाग येथे पर्यटनाच्या दृष्टीने जिल्ह्यातील एकूण १५ तालुक्यांना जरुर भेटी द्या. प्रत्येक तालुक्यात ऐतिहासिक वास्तू आहे.

1. महाड- छत्रपतींचा रायगड किल्ला, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी समतेसाठी दिलेला लढा, चवदार तळे
2. पोलादपूर- कविंद्र परमानंद यांची समाधी
3. श्रीवर्धन- बाळाजी विश्वनाथ पेशवे यांचे जन्मस्थान आणि श्रीहरिहरेश्वर
4. पनवेल- वासुदेव बळवंत फडके यांचे जन्मस्थान- शिरढोण.
5. उरण- घारापुरी लेणी
6. म्हसळा- काजूंचे आगर
7. तळा- किल्लाज
8. रोहा- सीडी देशमुख आणि पांडुरंग शास्त्री आठवले
9. कर्जत- माथेरानची छोटी रेल व थंड हवेचे ठिकाण
10. पेण- श्री गणपतीच्या मुर्तीसाठी प्रसिद्ध शहर
11. खालापूर- खोपोली विद्युत केंद्र
12. माणगाव- मुंबई-गोवा महामार्गावरील शहर संभाजी पुत्र शाहू यांचे जन्मस्थान गांगवली
13. मुरुड-जं‍जिरा समुद्रातील भव्य दिव्य किल्ला जंजिरा
14. अलिबाग येथील नागाव बीच, समुद्रातील कुलाबा किल्ला.

आवास आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सरखेल कान्होजी आंग्रे यांची कर्मभूमी असलेली येथील त्यांची समाधी. आपण अलिबागला बसने येताना दैनिक कृषीवलच्या कार्यालयासमोर उभा असलेला दिमाखदार सरखेल कान्होजी आंग्रे यांचा पुतळा दिसतो. त्यानंतर आपण शहरात आल्यावर सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या भव्य दिव्य एकूण 10 समाधींचे दर्शन होते. हा परिसर उत्तम होण्यासाठी शासनाने भरपूर मदत केलेली आहे, येथेही सरखेल कान्होजी आंग्रे यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. अलिबागच्या जनतेने आणि महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नाने तसेच राज्याच्या माजी मंत्री श्रीमती मीनाक्षीताई पाटील व सर्वांच्या सहकार्याने येथील परिसर हा अतिशय रमणीय आणि उत्साही झाला आहे. येथे एक विहिरही आहे. संपूर्ण प्राचीन वास्तुंचे नुतनीकरण करण्यात आले आहे. ज्या योध्याने बलदंड शरीर, मनाने आणि प्रयत्नाने इंग्रज, फ्रेंच, डच, पोर्तुगीजांना ठणकावून सांगितले होते, ही भूमी आमची आहे. खबरदार आमच्या सागरावर बिना परवानगीने आलात तर !

अशा कान्होजी आंग्रे ह्या स्वामीनिष्ठ सरदाराची आज २८६ वी पुण्यतिथी. दिनांक ४ जुलै १७२९ रोजी त्यांचे निधन झाले. त्यानिमित्त या शूरवीराच्या धडाडीचा, कार्याचा छोटीशी ओळख. त्यांच्या कर्तुत्वाची गाथा अशीच पुढे चालू राहील. सागर सांभाळणाऱ्या नेत्यास यानिमित्त आपला सर्वांचा मानाचा मुजरा.

-प्रा. श्रीपाद माधव नांदेडकर, धुळे
संपर्क 9833421127, 9404577020

Friday, 31 July 2015

स्वराज्याचे हिरे

प्रचार प्रसार प्रसिद्धी व माहिती संस्थानच्या वतीने सुरु केलेला अभिनव उपक्रम  स्वराज्याचे हिरे या उपक्रमात बोलताना संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे

स्वराज्याचे हिरे ------- महात्मा ज्योतिबा फुले

स्वराज्याचे हिरे ------- महात्मा ज्योतिबा फुले यांनी शोधली छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आणि साजरी केली पहिली शिवजयंती  !

Sunday, 14 June 2015

स्वराज्याचे हिरे




                                           तमाम स्वराज्य प्रेमी शिवपाईकांस विनम्र आवाहन                                    स्वराज्याचे हिरे या उपक्रमात सहभागी व्हावे व आपला सहयोग द्यावा !

Saturday, 13 June 2015

महाराजांच्या तलवारीचा शोध

महाराजांच्या तलवारीचा शोध 
परदेशातील महाराजांची रत्नजडीत तलवार स्वराज्यात आणावी 
छत्रपती शिवराय जी तलवार वापरत असत त्या एक नसून जास्त होत्या अशी माहिती समोर आली. काहीच्या मते दोन होत्या तर काहिंच्या मते चार होत्या संशोधकांनी इग्लंडच्या मुजिअम मध्ये असलेली तलवार हीच शिवरायांची तलवार असून ती परत करावी. यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. वास्तविक ती तलवार कोल्हापुर संस्थानच्या माध्यमातून इंग्रज अधिकाऱ्या मार्फत भेट म्हणुन इग्लंडला पोहचली. दुसरी तलवार ही तलवार ही सातारचे छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडे असून ती देखील छत्रपती शिवरायांची तलवार असल्याची माहिती समोर येते. तसेच काही संशोधकांनी प्रसिद्धीसाठी प्रतापगडावरिल भवानी मंदिरात असलेली तलवार शिवरायांची असल्याची माहिती सांगितली. परंतु वास्तविक ती तलवार सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची असून तशी माहिती प्रसिद्धी झालेली आहे. शिवकाळांत स्पेन मधुन भारतात तलवारीची आयात होत असत तशाच स्वरूपाची शिवरायांची तलवार स्पेन बनावटीची असल्याची माहितीही समोर आली आहे. वास्तविक यातील कोणतीही तलवार शिवरायांनी किंवा शिवरायांचीच आहे अशी पुराव्यानिशी ठाम माहिती समोर आलेली नाही.छत्रपती शिवरायांनी ज्या एका किंवा जास्त तलवारीचा वापर करून स्वराज्य उभारले त्याची सत्य खात्रीशीर,माहिती शोध घेण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असून शिवराज्याभिषेक दिनी संस्थानच्या वतीनी प्रसिध्द केलेल्या प्रत्रकात सदराची मागणी केली आहे. तरी या संदर्भात आपणाकडे काय माहिती                                                                            असल्यास सहकार्य करावे.
                                                                                                                                   राजेश खडके

Friday, 12 June 2015

आपण गप्प बसायचे काय ?

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा बारा बलुतेदारी व अठरा पगड जातींना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण करणारा इतिहास आहे हे आपण प्रथम लक्षात घेतले पाहिजे . परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणारे व लिहणारे हिंदु धर्म पंडित छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांची बदनामी करताना दिसत आहे. आपल्या राजाची बदनामी होत असताना दिसत आहे मात्र आपण फक्त उघड्या डोळ्यांनी पहात आहे असे का ? आपण हिंदु आहोत म्हणुन आपले चुकले आहे काय ? असाच प्रश्न आज हिंदु तरुणां पुढे उभा राहिला आहे ? कारण बदनामी होताना तर दिसत आहे पण आपण हिंदु आहोत आणि बदनामी करणारे बामन म्हणून आपण गप्प बसायचे काय ? असा प्रश्न त्या तरुणां पुढे राहिला उभा आहे. याचे उत्तर कोण देणार असा माझा प्रश्न आहे

Sunday, 26 April 2015

स्वराज्याचे हिरे

तमाम स्वराज्य प्रेमी शिवापाईकांस विनम्र आवाहन

      स्वराज्यासाठी छत्रपती शिवरांया बरोबर महाराष्ट्राच्या दरे कपारीतील शूर धाडसी राष्ट्रभक्त तरुणांनी जीवाचे रान करून साथ दिली. पुढे त्याच्यांच प्रेरणेतुन याच शूर वीरांनी स्वराज्याचा लढा सुरु ठेवला. अशा शुर मावळ्यांच्या समाधीचा जिर्णोदार झाला पाहिजे त्यांच्या वंशजाची आजही परिस्थिती हालाखीची आहे त्यांच्या वर सरकारने लक्ष घालून त्यांना मान सन्मान देऊन चांगले जीवन जगण्यासाठी मार्ग करून द्यावा यासाठी "स्वराज्याचे हिरे" असे अभियान सुरु केले आहे आपण स्वराज्य प्रेमी शिवपाईक म्हणून या अभियानात सहभागी व्हावे यासाठी स्वाराज्याचे पहिले तोरण म्हणून "चलो तोरणागड" व स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून "चलो राजगड" या उपक्रमात लाखोंच्या संख्येने सहयोग द्यावा

                                                                                                               राजेश खडके
                                                                                                               अध्यक्ष
                                                                                         प्रचार प्रसार प्रसिध्दी व माहिती संस्थान
                                                                                                         महाराष्ट्र राज्य
                                                                                           Email-khadke.rajesh@gmail.com
                                                                                               visit to www.pppms.org.in

Sunday, 29 March 2015

स्वराज्याची पहिली राजधानी राजगड

राजगड हा अतिशय उंच आहे. त्याची उंची पाहता तो सर्व किल्ल्यांत श्रेष्ठ आहे. त्याचा घेर बारा कोसांचा आहे. त्याच्या मजबुतीची आणि उंचीची कल्पनाही करवत नाही. या डोंगरदऱ्यांतून आणि घनघोर अरण्यातून वाऱ्याशिवाय दुसरे कुणीही फिरकू शकत नाही..’ स्वराज्यावर चालून आलेल्या औरंगजेबाबरोबरच्या साकी मुस्तैदखान याने शिवरायांच्या राजगडाबद्दल ‘मासिरे आलमगिरी’ या ग्रंथात केलेले हे वर्णन! स्वकीयांनी केलेल्या कौतुकापेक्षा शत्रूने व्यक्त केलेले हे भयच राजगडची खरी ओळख करून देते. हीच ओळख ठेवून कानंदी अन् गुंजवणीच्या खोऱ्यात उतरावे आणि या गडाचे भारदस्त, पुरुषी, रांगडे रूप डोळय़ांत सामावून घ्यावे!
खरेतर राजगडाचे रूप कायम चिरतरुण, लोभस. कुठल्याही ऋतूत पाहावे असे. त्याच्या पहिल्या दर्शनातच तो प्रेमात पाडतो. पण त्यातूनही वर्षां ऋतूने भाद्रपदात प्रवेश केला की हिरवाईत बुडालेला हा गड सोनकी-तेरडय़ाच्या रानफुलांनी जणू नव्या नवरीप्रमाणे सजू पाहतो. पाऊस, ढग-धुके आणि हिरवाई-रानफुलांचा सहवास हे सर्व राजगडाचा प्रत्येक कोन, दृश्य बदलून टाकते. वास्तूंचे रूप खुलते. तेव्हा अशा वर्षांकाळी एकदा तरी या गडावर यावे आणि त्याचे होऊन जावे.
पुणे-बंगलोर महामार्गावर पुणे जिल्हय़ातील नसरापूरहून एक फाटा वेल्हय़ाकडे वळतो. या मार्गावरच मार्गासनी हे गाव लागते. या गावातूनच साखर, गुंजवणे, वाजेघर, पाली आणि भूतोंडे गावाकडे एक वाट जाते. या सर्व गावांच्या बरोबर मध्यभागी डोईवरच साऱ्या मुलखावर नजर ठेवून हा ढाण्या वाघ कधीचा ठाण मांडून बसला आहे. त्याला भेटायचे असेल तर वर उल्लेख केलेल्या कुठल्याही गावच्या रहाळात जायचे आणि तिथून वर निघणाऱ्या वाट-आडवाटेने गड गाठायचा. गुंजवण्यातून गुंजण दरवाजाने, साखरमधून चोरदिंडीने, वाजेघर-पालीतून पाली दरवाजाने आणि भूतोंडेतून अळू दरवाजाने गडात शिरता येते. यातली पाली दरवाजाची वाट तेवढी सामान्यांसाठी, अन्य वाटा डोंगरदऱ्यात संसार मांडणाऱ्यांच्या!
पालीकडून येणारा गडाचा राजमार्ग! पायथ्याच्या पाल ऊर्फ पाली गावातही राजवाडा होता. त्याचे अवशेष आजही दिसतात. या गावातच गडाचे मुख्य हवालदार भोसले कुटुंबीयांचेही वंशज राहतात. या पाली मार्गाने गडावर निघालो की तासा-दोन तासांत आपण पाली दरवाजात हजर होतो.
चौदाशे मीटर उंचीचा हा डोंगर मूळ मुरुंबदेवाचा म्हणून ओळखला जाई. हा मुरुंबदेव बहुधा ब्रह्मदेवाचा अपभ्रंश असावा! यासाठी दाखला म्हणून गडावरील ब्रह्मर्षी ऊर्फ ब्रrोश्वराचे मंदिर दाखवले जाते. अनेकदा अपभ्रंश उच्चारातही एक ग्रामीण लडिवाळ वाटतो. दरम्यान, स्वराज्य स्थापनेच्या काळात शिवरायांना तोरणा गडावर काही धनसंपत्ती प्राप्त झाली आणि याचाच उपयोग स्वराज्यासाठी करत त्यांनी शेजारच्या या मुरुंबदेवाच्या डोंगरावर एक बुलंद गड आकारास आणला.
एक उंच पर्वत, ज्याला बलदंड अशा तीन भुजा आणि मधोमध एक पुन्हा कातळ पर्वत! राजगडाचा हा मूळ भूगोल! नैसर्गिकदृष्टय़ा अभेद्यपण असलेल्या या पर्वतावर शिवरायांनी त्यांच्या राजधानीचा संकल्प सोडला. डोंगराच्या तीन सोंडांवर पद्मावती, सुवेळा आणि संजीवनी या तीन अभेद्य माच्या तयार झाल्या. या माच्यांच्या मधोमध असलेल्या एका कातळ पर्वतावर बालेकिल्ला उभा राहिला आणि पाहता पाहता स्वराज्याची राजधानी थाटली, राजगड!
हा सारा देखावा आकाशातून पाहू गेलो तर तो एखाद्या पंख पसरलेल्या पक्ष्याप्रमाणे भासतो. स्वराज्याच्या राजधानीचे हे जणू बलदंड बाहूच! गडाच्या मध्यावरच्या सपाटी आणि हाराकिरीच्या जागेला तटबंदीचे शेलापागोटे चढवले की ती होते माची. अनेक गडांना ही माची दिसते. राजगडाचे नशीब याबाबतीत थोडे थोर; ज्यातून या गडाला पद्मावती, संजीवनी आणि सुवेळासारख्या तीन लढाऊ माच्या मिळाल्या. जणू स्वराज्यासाठी लढणाऱ्या महिषासुरमर्दिनी, दुर्गा आणि कालीचेच हे एक-एक रूप!
मुघलांच्या आक्रमणावेळी या माच्यांनीच अगोदर हा गड लढवला. याबाबत मुस्तैदखान म्हणतो, ‘राजगडाभोवतीच्या या माच्या म्हणजे तीन स्वतंत्र किल्ले आहेत. त्यांच्या भक्कम तटबंदीमुळे हा किल्ला जिंकणे अशक्य आहे. तटाच्या खाली भयंकर दऱ्या आहेत. त्यांच्याकडे जाणाऱ्या वाटा अतिशय अवघड आहेत.’
राजगडाची इतिहासातील ही अशी वर्णने वाचावीत आणि त्याचे दडपण घेतच गडावर दाखल व्हावे. गडावर येणाऱ्या बहुतेक वाटा यातील पद्मावती माचीवर दाखल होतात. यातल्याच पालीमार्गे महादरवाजात यावे. पाली दरवाजा! एकाखाली एक अशा दोन कमानी असलेले हे गडाचे महाद्वार. अन्यत्र असणाऱ्या चौक्या-पहारे असे सारे काही या बांधकामात, पण त्याहीपेक्षा गडाचा दरवाजा पर्वताला समांतर बांधत दडवून ठेवण्याचे ‘गोमुखी’ शिवदुर्गविज्ञानही इथे सामावलेले.
पद्मावती माचीवर बऱ्यापैकी सपाटी असल्याने इथे शिवकाळात मोठी वहिवाट होती. राजांचा राहता वाडा, हवालदार-किल्लेदाराचे वाडे, शिबंदीची घरे, रत्नशाळा, सदर, पद्मावती-रामेश्वराचे मंदिर, सईबाईंची समाधी, पद्मावती तलाव व अन्य तळी, धान्याची कोठारे, दारूगोळय़ाचे कोठार, चोरदिंडी, गुंजण दरवाजा या साऱ्यांमधून ही माची बराच इतिहास सांगते-दाखवते!
यातील प्रत्येक वास्तूच नाहीतर सगळा राजगडच खरेतर शिवरायांचा पदस्पर्श-सहवास अनुभवलेला, त्यामुळे इथला दगड नि दगड देवघरातील एखादा टाक वाटावा. पण या खऱ्याखुऱ्या शिवसृष्टीचे जतन करणे तर दूरच, पण आमच्या नतद्रष्टेपणामुळे अनेकांनी वाट लावली आहे. यातील सदरेचेच एक उदाहरण पाहूयात. भोर संस्थानच्या ताब्यातून भारत सरकारकडे हस्तांतर होताना ही सदर छतासह सुस्थितीत होती. त्या वास्तूत छत्रपती शिवराय जिथे बसत त्या जागी लोड-तक्के ठेवून पूजा करत रोजचा कारभार केला जाई. स्वातंत्र्यवर्षांच्या या कालखंडातच ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. ग. ह. खरे यांनी लिहिलेल्या ‘स्वराज्यातील तीन दुर्ग’ या पुस्तकात सुरुदार नक्षीचे खांब, भिंती, कोनाडे असलेल्या या सदरेचे एक दुर्मिळ छायाचित्र प्रसिद्ध केले आहे. त्याच वेळी या सदरेची दुरवस्था होऊ लागल्याचे त्यांनी म्हटले आहे. पुढे १९६०च्या दशकात ज्येष्ठ दुर्गअभ्यासक आणि साहित्यिक यांनी राजगडाच्या काढलेल्या छायाचित्रांत या सदरेच्या जागी केवळ एक खांब उभा असलेला दिसत आहे. त्यांच्या या छायाचित्रसंग्रहात या सदरेपुढे एक बांधीव ओटाही दिसतो. पुढील दहा-वीस वर्षांत हा खांब आणि ओटाही गायब झाला. यानंतर पुढील अनेक वर्षे या सदरेच्या जोत्याचे तळखडे दिसत होते. पण गेल्या पाच-दहा वर्षांत जीर्णोद्धाराच्यानावाखाली आता सदरेचे हे सारे ऐतिहासिक दृश्यच पार साफ पुसून गेले आहे. १९५०-६०पर्यंत निसर्गाच्या तडाख्यांना तोंड देत अडीचशे वर्षे टिकलेली वास्तू पुढे स्वातंत्र्यांच्या केवळ साठ वर्षांत पार नाहीशी झाली.
ऐतिहासिक वास्तूंच्या पडझडीस निसर्ग किती जबाबदार आणि मानवाचे करंटे हात किती जबाबदार?
असो! पद्मावती मंदिरात आपला संसार उतरवावा आणि पश्चिमेकडील संजीवनीकडे वळावे. तीन टप्प्यांत उतरणारी संजीवनी माची तब्बल दीड ते दोन किलोमीटर लांब पसरलेली आहे. या दरम्यानच्या तटात तब्बल १९ बुरूज येतात. सामान्यत: कुठल्याही गडकोटांना तटबंदीचा एकच पदर असतो. पण राजगडावरील सुवेळा आणि संजीवनीच्या या तटास बाहेरून आणखी एक चिलखत चढवले आहे. या एकात एक असलेल्या बुरुजांमध्ये ये-जा करण्यासाठी भुयारी मार्ग ठेवलेले आहेत. माचीच्या आतील मोकळय़ा जागेत घरांचे काही अवशेष दिसतात. त्यांच्यासाठी टाक्या खोदत पाण्याचीही जागोजागी सोय केलेली आहे. वर-खाली, सर्पाकार होत धावणारी दुहेरी तटबंदीची ही माची दूरवरून एखादी सळसळती नागीणच वाटते. गडकोटांचे हेच गूढ घेऊन या माचीवर उतरावे, दुहेरी तटांमधील नाळेतून भय घेत फिरावे.. बुरुजांमध्ये उतरणारे दिंडी दरवाजे, तोफेच्या कमानी, माऱ्याच्या जंग्या आणि वन्यप्राण्यांची शिल्पे हे सारे आपल्याकडे रोखून पाहत असतात.. संजीवनीचे हे अद्भुत दर्शन अंगी शिवकाळाचा ज्वर चढवते. तो अंगी घ्यावा आणि पूर्वेच्या सुवेळा माचीवर उतरावे.
गडाची ही धाकटी माची. पूर्वेकडे तोंड केलेली, सु वेळी खुलणारी म्हणून सुवेळा! तिच्यात पोहोचण्यापूर्वीच एका डुब्यावर तानाजी मालुसरे, येसाजी कंक आणि शिळीमकर या सरदारांची उद्ध्वस्त घरटी त्यांच्या कथा ऐकवतात. यांच्यापुढे मजबूत बांध्याचा झुंजार बुरूज लागतो. तो पाहत लगतच्या एका दिंडीदरवाजाने सुवेळावर उतरायचे. इथे तटातच एका घुमटीतील गणेश कैक सालापासून या परिसरावर श्रद्धा ठेवून आहे.
सुवेळाच्या मधोमध एक कातळ उभा ठाकला आहे. समोरून त्याचा आकार एखाद्या हत्तीसारखा वाटतो. या कातळाच्या पोटात शे-पन्नास माणूस बसू शकेल असे आरपार पडलेले छिद्र आहे. या भौगोलिक आविष्कारास कोणी ‘नेढे’ म्हणतात, तर कोणी ‘वाघाचा डोळा’! नाव काही का असेना, पण याची नजर एखाद्या ढाण्या वाघाप्रमाणे दहा-पंधरा किलोमीटरच्या परिघात सर्वत्र फिरत असते. हे नेढे आणि पुढची सुवेळा फिरायची आणि मग बालेकिल्ल्याची वाट धरायची.
बेलाग बालेकिल्ला
चिलखती बांधणीच्या माच्यांप्रमाणेच अभेद्य बालेकिल्ला हेही राजगडाचे वैभव! सात-आठशे फूट उंच, चहूबाजूंनी तुटलेले कडे अशा या बालेकिल्ल्याबद्दल पं. महादेवशास्त्री जोशी लिहितात- ‘..साडेचार हजार फूट उंचीला भिडणारा हा खडक म्हणजे ‘शुद्ध दगड’ आहे. मेघ शिळधारी वर्षतात, पण तिथे तृणबीजही उगवत नाही, मग झाडे-झुडपे कुठली! तो पावसात भिजतो, वाऱ्यावर सुकतो आणि उन्हात तापतो, जणू युगायुगांचा उभा अनिकेत तपस्वीच!’
सुवेळा आणि पद्मावतीच्या मधूनच या बालेकिल्ल्यावर वाट निघते. निघते म्हणजे, कडय़ावर चढते. खोबण्या तयार करत केलेल्या या वाटेवर पाय रोवत आणि शरीर वर सरकवत चढावे लागते. पण एवढे कष्ट करत वर आलो की दिसणारे महाद्वार सारे कष्ट तिथल्या तिथे फेडून टाकते. दरवाजाचे हे शिल्प म्हणजे एक सुरेख कोंदण! भल्या सकाळी सूर्योदयाच्या वेळी इथे यावे आणि या कोंदणातून पूर्वेकडचा दिसणारा देखावा आयुष्यभराची एक आठवण म्हणून मनी साठवावा. ..समोर सुवेळाचा लयबद्ध आविष्कार, उजवीकडचे भाटघर धरणाचे पात्र, नुकतीच उठू पाहणारी छोटी खेडी, धुक्यात उलगडत जाणाऱ्या सहय़ाद्रीच्या रांगा आणि या साऱ्या चित्रावर आपली पावले उमटवत निघालेली पूर्वा! राजगडाचे हे कर्ज घ्यायचे आणि पुढे निघायचे.
वर आलो की चहू दिशांचे सिंहगड, पुरंदर-वज्रगड, रोहिडा, रायरेश्वर-कोळेश्वरचे पठार, त्यामागचा कमळगड, पाचगणी-महाबळेश्वर, प्रतापगड-मकरंदगड, पश्चिम अंगाचा लिंगाणा, त्यामागचा रायगड आणि अगदी हातावरचा राजगडाचा धाकटा भाऊ तोरणा असे बरेच मोठे ‘स्वराज्य’ दिसू लागते. खुद्द बालेकिल्ल्यावर जननी, ब्रह्मर्षीचे मंदिर, राजांचा राहता वाडा, अंबरखाना, तळी अन्य घरांचे अवशेष दिसतात. हा सारा परिसर आणि हे अवशेष पाहिले की शिवकाळाची गुंगी चढते. मग राजगडही बोलू लागतो.
..इसवी सन १६४८ ते १६७२. तब्बल पंचवीस वर्षे महाराजांनी इथे वास्तव्य केले. शिवरायांच्या सहवासाचे सर्वाधिक भाग्य राजगडाएवढे अन्य कुणालाही मिळाले नसेल. अनेकदा वाटते महाराजांचे हे वास्तव्य राजगडाच्या अभेद्यपणातून होते की त्याच्यावरील प्रेमातून!..त्यांच्या या वास्तव्यात या गडाने छत्रपती राजारामांचा जन्म अनुभवला, तसाच सईबाईंचा मृत्यूही सोसला. अफझलखानाच्या वधासाठी महाराज याच गडावरून बाहेर पडले आणि आग्रा येथील औरंगजेबाच्या कैदेतून सुटका झाल्यावर त्यांनी पहिले पाऊलही राजगडावरच टाकले.
असा हा राजांचा गड आणि गडांचा राजा- राजगड! शरीराने आता थकला आहे, मनाने भागला आहे. पण तरी आजही त्याच्या या अंगणी आलो की या थरथरत्या शरीरातही नवचैतन्य संचारते. मग आलेल्या प्रत्येकाला तो पुन्हा शिवकाळात घेऊन जातो आणि शिवभारताची कथा ऐकवतो!

तोरणा Torna

स्वराज्याचे पहिले तोरण तोरणागड :पुणे-बंगलोर महामार्गावरील पुणे जिल्हय़ातील नसरापूरहून पश्चिमेला कानद खोऱ्यात एक वाट जाते. या वाटेवरचे शेवटचे मोठे गाव वेल्हे! या वेल्हय़ाच्याच डोक्यावर एका उंच जागी बसला आहे शिवरायांच्या स्वराज्याचा एक मुख्य शिलेदार तोरणा ऊर्फ प्रचंडगड!

पुण्याहून नसरापूर मार्गे वेल्हे ६८ किलोमीटर. स्वारगेटहून वेल्हय़ासाठी थेट एस.टी. बससेवा आहे. स्वत:चे वाहन असेल तर आता पुण्याहून पानशेत रस्त्यावरून पाबे घाटमार्गेही वेल्हय़ाला जवळच्या रस्त्याने जाता येते. वेल्हे हे आजचे तालुक्याचे ठिकाण, पण पूर्वी भोर संस्थानच्या काळात प्रचंडगड हा तालुका होता आणि वेल्हे ही त्याची बाजारपेठ होती. काळाने हे चक्र पूर्ण उलटे फिरवले. असो! तर या वेल्हय़ापर्यंत पोहोचलो, की तोरणा त्याचा हा प्रचंड आकार, उंची घेऊन समोर उभा ठाकतो. त्याच्या या दुर्गमतेकडे पाहताच कचदिलांचे पाय इथेच गळतात, तर जातीच्या मावळय़ांचे रक्त सळसळू लागते. या ऊर्मीतूनच वेल्हय़ातून निघणाऱ्या या वाटेवर स्वार व्हायचे. 
खरेतर तोरण्याच्या उभ्या पर्वताला भिडण्यापूर्वीच काही टेकडय़ांचा खेळ अगोदर पार पाडावा लागतो. एक चढली की दुसरी मग तिसरी असे हे टेकडय़ांचे कंटाळवाणे खाली-वर होते. मग यानंतर आपण मुख्य डोंगराला भिडतो. तोरण्याची उंची ४६०६ फूट आणि सारी वाट उभ्या धारेवरची. यामुळे थोडय़ाच वेळात घाम गळायला सुरुवात होते. एक-दोन ठिकाणी उभ्या कडय़ात कठडय़ांचा आधार घेत वाट वर सरकते.इतिहासात अशा दुर्दम्य चढाईबरोबर गडाभोवतीच्या संरक्षक मेटांचाही सामना करावा लागे. कुठल्याही डोंगराला उताराच्या दिशेने काही शिरा खाली उतरतात. या डोंगरशिरांवरूनच गिरिदुर्गावर जाणाऱ्या वाटा धावतात. गडांवर चढणाऱ्या या वाटा रोखण्यासाठी या डोंगरशिरांच्या सपाटीवरच काही लढाऊ जमातींची वस्ती वसवली जायची. यांना ‘मेट’ म्हटले जाई. ही अशी मेटे विशिष्ट गाव, जात किंवा आडनावांच्या लोकांच्या प्रतिष्ठेची असत. जेव्हा शत्रूचा हल्ला होई त्या वेळी ही मेटेच अगोदर प्राणपणाने लढत. तोरण्याभोवतीही अशी सात मेटे होती. यातील वरली पेठ, वाघदरा, भट्टी, बार्शी माळ, पिलवरे ही मेटे आणि त्यावरील अनुक्रमे भुरूक, देवगिरीकर, कोकाटे, भुरूक, पिलवरे ही घराणी आजही या भागात प्रचलित आहेत.

असो! वर्तमानातही तोरण्याची ही चढाई आपला कस लावते आणि मगच बिनी दरवाजातून गडप्रवेशास अनुमती देते.
या गडावर पूर्वी तोरण जातीची झाडे जास्त होती म्हणून याला तोरणा असे नाव मिळाले असे म्हटले जाते. याशिवाय हा गड जिंकत शिवरायांनी स्वराज्याचे तोरण लावले असाही एक मोठा गैरसमज समाजात रूढ आहे, पण खरेतर शिवरायांनी तोरणा घेण्यापूर्वीच रोहिडा, कोंढाणा जिंकत स्वराज्याची घोडदौड सुरू केलेली होती.
झुंजार माची, बुधला माची आणि दोन्हीच्या मधोमध उंचीवरचा बालेकिल्ला हे तोरण्याचे स्वरूप! बिनी दरवाजा आणि त्यापाठोपाठच्या कोठी दरवाजातून आपण थेट बालेकिल्ल्यातच शिरतो. किल्ल्यावर जाताना थेट बालेकिल्ल्यातील प्रवेश हेही तोरण्याचे वैशिष्टय़ आहे. आत शिरताच समोर दोन टाक्या दिसतात. तोरण आणि खोकड अशी त्यांची नावे. इथेच तटावर तोरणजाईची घुमटी आहे. इथे यायचे आणि तोरण्याच्या ‘त्या’ इतिहासात शिरायचे.
.. इसवी सन १६४७चा तो प्रसंग! स्वतंत्र स्वराज्य स्थापनेचे स्वप्न घेऊन शिवराय इथे तोरण्याच्या पायी अवतरले होते. गड विजापूरच्या बादशहाकडे, पण किल्लेदार मराठा! त्याला बोलावणे पाठवले गेले. त्या रात्री राजांनी त्याला काय सांगितले हे त्या काळ आणि काळोखालाच ठाऊक! पण दुसऱ्या दिवशी सकाळी गडावरचे बादशाही निशाण खाली उतरले आणि मराठी जरीपटका फडफडू लागला. राजे विजयी मुद्रेने गडावर आले. गड स्वराज्यात आला. दुरुस्तीचे आदेश सुटले 
हंडे मिळाले. स्वराज्यासाठी हा दुसरा शुभसंकेत! मग त्याच जागी या तोरणजाईची स्थापना झाली आणि या संपत्तीतून शेजारच्याच मुरुंबदेवाच्या डोंगरावर स्वराज्याची राजधानी राजगड आकारास आली. शिवकाळातील हे असे भारावलेले प्रसंग आठवायचे आणि गडदर्शनास चालू पडायचे!

बालेकिल्ल्याच्या मधोमध गडदेवता मेंगाईचे मंदिर. सध्या उपेक्षित असलेले हे मंदिर एकेकाळी मात्र सतत गजबजलेले होते. नवरात्रात इथे मोठा उत्सव व्हायचा. कथा, कीर्तन, गोंधळ, सामुदायिक भोजन असा मोठा थाट या देवीपुढे उडत असे. भोर संस्थानकडे हा किल्ला 
असेपर्यंत मेंगाई भोवतीचा हा थाटमाट सुरू होता. पण पुढे ‘स्वराज्य’ जाऊन ‘स्वातंत्र्य’ आले आणि गडांचे मात्र जणू ‘पारतंत्र्य’ सुरू झाले. देव जिथे उघडय़ावर आले तिथे देवळाची व्यथा ती काय? गेल्या काही वर्षांत जीर्णोद्धाराचे हात लागल्याने मेंगाईचे रूप थोडेफार पालटले.
मंदिरासमोरच किल्लेदाराच्या दिवाणघराचे अवशेष आहेत. पं. महादेवशास्त्री जोशी यांनी स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या दशकात लिहिलेल्या ‘महाराष्ट्राची धारातीर्थे’ या पुस्तकात तोरणागडाचे वर्णन दिलेले आहे. यामध्ये संध्याकाळी गडाचे दरवाजे बंद होत असल्याचे आणि गडावर त्याचा कारभार पाहणारे किल्लेदार, गुरव राहात असल्याचा उल्लेख आला आहे. स्वत: जोशी यांनी ज्येष्ठ साहित्यिक गो. नी. दांडेकर यांच्याबरोबर किल्लेदाराच्या या दिवाणघरातच मुक्काम केल्याचा उल्लेखही आहे. आज केवळ अवशेषांच्या रूपात दिसणाऱ्या किल्ल्यांच्या पाश्र्वभूमीवर हा सारा तपशील वाचताना खूपच मजेशीर वाटतो.
मेंगाईच्या मंदिराशेजारी गडावरील महादेव तोरणेश्वराचे मंदिर आहे. या देवळासमोर काही वीरगळ, सतीशिळा दिसतात. इथून पूर्वेला जाऊ लागलो, की कोठी दरवाजा ते झुंजार माचीपर्यंतची उत्तरेकडची अखंड तटबंदी म्हणजे चीनच्या भिंतीचेच एक छोटे रूप भासते. वाटेत शिबंदीची घरटी, दारूगोळय़ांची कोठारे, म्हसोबा टाके, ढालकाठीची जागा असे बरेच काही दिसते. आता हे सारे निव्वळ अवशेष, पण तेच त्यांची ही नावे, त्यांचा उपयोग समजला, की जणू या प्रत्येकामध्ये पुन्हा जीव 
आलो, की खालच्या टप्प्यावर डोंगररांगेवरून पूर्वेकडे उधळलेला झुंजार माचीचा देखावा अचानक समोर उभा राहतो.
राजगडाला जशी संजीवनी, सुवेळा, पद्मावती तशीच तोरण्याला झुंजार आणि बुधला माची. यातील झुंजार विस्ताराने छोटी, पण आक्रमक! राजगडाच्या दिशेने निघालेल्या एका बलदंड सोंडेवरील हे नागमोडी बांधकाम म्हणजे एखादी सळसळणारी नागीणच! सळसळत जात जिने एकदम आपला फणा वर उचलावा अशी!
या माचीच्या दोन्ही बाजूला खोल कडे आणि डोंगराच्या या धारेवरच दोन टप्प्यांमधील माचीचे बांधकाम. ज्याला चिलखती बुरुजांनी आणखी भक्कम केले आहे. तिचे वरून दिसणारे दर्शन जितके पोटात धडकी भरवणारे तितकेच तिच्या अंगाखांद्यावरून फिरताना दरारा वाढवणारे. शिवरायांच्या दुर्गाचे हे असले चंडिकेचे रूप पाहिले, की उत्तरेकडील किल्ल्यांचे अस्मानी सौंदर्य त्यापुढे फिके वाटू लागते!
दरम्यान, या माचीवर सध्या उतरणे हेही एक आव्हानच आहे. जुनी वाट दगडमातीने बुजल्याने ढालकाठीजवळ तटावरून बाहेरील कडय़ावर उतरत, तटाकडेने चालत माचीवर यावे लागते. खालचे खोल कडे पाहता ही सारी जिवावरची कसरत ठरते. त्यापेक्षा पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली आणि दुर्गप्रेमींच्या श्रमदानातून माचीवर उतरणारा हा मूळ दरवाजा मोकळा करता आला तर सामान्यांनाही या माचीवर उतरता येईल.
बुधला माची
गडाच्या पश्चिमेला सारे कोकण मांडले आहे. हे कोकण पाहण्यासाठी मग बालेकिल्ल्याच्या कोकण दरवाजातून बुधला माचीवर उतरावे. विस्ताराने मोठी असलेली ही माची पश्चिमेला दूपर्यंत पसरली आहे. अगदी शेवटी तिला दक्षिणेला एक फाटा फुटला आहे. या पश्चिम आणि दक्षिण फाटय़ाच्या मधोमध टेकडीवर एक भलामोठा सुळका आहे. दूरवरून हा सुळका एखादा तेलाचा बुधला उपडा ठेवल्याप्रमाणे दिसतो, म्हणून या माचीला ‘बुधला’ असे नाव देण्यात आले. या माचीवर उतरण्यासाठी जसा कोकण दरवाजा, तसेच खालून वर माचीत येण्यासाठी भगत, महा, चित्ता आणि वळंजाई असे चार दरवाजे आहेत. यातील दक्षिण फाटय़ावरील भगत दरवाजातून डोंगरदांडय़ाने एक वाट थेट राजगडाला जाऊन मिळते. या
माचीवर स्वतंत्र सदर, दारूगोळय़ाची कोठारे, विशाळा, घोडय़ाचे जिन, गंगजाई मंदिर तसेच काही पाण्याच्या टाक्या आहेत. कापूर, खांब, महाळुंगे, शिवगंगा, पाताळगंगा ही यातील काही टाक्यांची नावे इतिहासाने नोंदवून ठेवलेली आहेत. अशा या अनेक ऐतिहासिक खाणाखुणा आजही तो काळ उभा करतात.
बुधला पाहून पुन्हा बालेकिल्ल्यात यावे. बालेकिल्ला ही गडावरची सर्वात उंचावरची जागा. उत्तरेकडे कानद आणि दक्षिणेकडची वेळवंड नदीची खोरी इथूनच न्याहाळावीत. भोवतालच्या डोंगररांगांतील सिंहगड, राजगड, लिंगाणा, रायगड हे तोरण्याचे भाईबंद पाहावेत. तसे ते तोरण्याच्या उंचीपुढे धाकुटलेच वाटतात. यातही दक्षिण अंगाला दरीतून वर उसळी घेत उगवलेला ‘लिंगाणा’ त्याचा धाक दाखवतो. आकाश स्वच्छ असेल तर त्यापाठीमागच्या रायगडावरील वास्तूंचाही अंदाज येतो.
तोरण्याच्या या आभाळातील उंच जागीच्या घराबद्दल जेम्स डग्लस हा इंग्रजी लेखकही कौतुकाने म्हणतो,
"Sinhagad is lion's den, then Torana is eagel's nest."
-‘सिंहगड जर सिंहाची गुहा असेल तर तोरण्यास गरुडाचे घरटेच म्हणावे लागेल!’
इसवी सन १८८०मध्ये तोरणा भेटीवर आलेला डग्लस पुढे लिहितो, ‘‘शिवाजीने जिंकलेला हा पहिला मोठा किल्ला. या किल्ल्याभोवती त्याने मराठी राज्याचा पसारा वाढवला. ज्या मराठी राज्याने मुघल बादशाहचे आसन हलविले, त्याचे हे उगमस्थान आहे. या ठिकाणी एकेकाळी कितीतरी लढाया झाल्या. पण आज येथे काय दिसत आहे? जिकडे तिकडे दगडांचे ढीगच्या ढीग पडले आहेत. पडक्या इमारतींवर उंच गवत वाढले आहे.’’ काळाच्या ओघात थकलेला तोरणा पाहून या विदेशी डग्लसचे मनही हेलावले.
तोरण्याची ही दुर्गमता-उंचीबद्दल मुघलांच्या नोंदीतूनही काही माहिती मिळते. १० मार्च १७०४ रोजी औरंगजेबाने हा किल्ला जिंकला आणि त्याचे नाव ठेवले- ‘फुतूहुल्घैब’! म्हणजे ‘दैवी विजय’! मग हा ‘दैवी विजय’ घेत हातमखान हा किल्लेदार काम करू लागला, पण काही दिवसांतच त्याला या ‘फुतूहुल्घैब’मधील भयाणता टोचू लागली. एका पत्रात तो लिहितो,
दैवाच्या विलक्षण तडाख्यामुळे मी तोरण्यात येऊन पडलो आहे. हे स्थळ तिटकारा करण्यासारखे आहे. भुतांचे आणि राक्षसांचे निवासस्थान आहे. किल्ल्याभोवतीच्या दऱ्या सप्तपाताळातील नरकासारख्या दिसतात.’
ही सारी वर्णने आजही गडावर आलो की खरी वाटतात. तोरणा खरोखरच एखाद्या उंच जागीचे गरुडाचे घरटे भासू लागते.
बालेकिल्ल्यातूनच गडाचा भलामोठा विस्तारही नजरेत येतो. खरेतर त्याच्या या विस्तारावरूनच शिवरायांनी तोरण्याचे ‘प्रचंडगड’ असे नाव ठेवले. ही प्रचंड उंची आणि विस्तारामुळे मग गड पाहण्यास एक दिवस 
अपुरा पडतो. यासाठी सर्व तयारीनिशी गडावर मेंगाईच्या मंदिरात मुक्कामासाठीच यावे लागते. पण तोरण्यावरील या मुक्कामाबाबत काही दुर्गप्रवाशांनी त्यांना झालेल्या चित्रविचित्र भासांबद्दल लिहून ठेवले आहे. स्थानिक लोक याबाबत धानेबच्या दिवेकर आडनावाच्या ब्राह्मणाच्या पिशाचाचा दाखला देतात. गंमत अशी, की या अशा भुतासाठी वेल्हय़ाच्या तहसील कार्यालयाकडूनही नैवेद्यासाठी काही खर्च मंजूर असल्याचे समजले. खरे खोटे काय ती मेंगाईच जाणे! पण आम्ही मात्र इथे एकदा चक्क अमावास्येच्या रात्री मुक्काम ठोकला. त्या रात्री चांदण्यांत बुधल्यापासून-झुंजार माचीपर्यंत सारा गड फिरलो. तट-बुरूज आणि इमारतींबरोबर गप्पा मारल्या. पण त्या काळोखातही ती रात्र केवळ ‘शिवरात्र’च वाटली!

स्वराज्याचे हिरे Dimond of the Swaraj