Tuesday, 1 November 2016

चंदेरी किल्ला

देरी किल्ला हा २३०० फुट उंचीचा गिरीदुर्ग प्रकारातील किल्ला आहे. ठाणे जिल्ह्यातील माथेरान डोंगर रांगेतील हा किल्ला ट्रेकर्सच्या दृष्टीने कठीण समजला जातो. भरपूर प्रमाणत लोक या ठिकाणी भेट देण्यासाठी व किल्ला पाहण्यासाठी येत असतात.

मुंबई-पुणे लोहमार्गावरून कल्याणहून कर्जतकडे जाताना एक डोंगररांग आहे. त्यातून आपला भला थोरला माथा उंचावलेला एक प्रचंड सुळका दिसतो. त्याचे नाव चंदेरी. बदलापूर-वांगणी स्थानकादरम्यान बदलापूर-कर्जत रस्त्यावर गोरेगाव नावाचे गाव आहे. येथूनच चंदेरीची वाट आहे.

नाखिंड, चंदेरी, म्हसमाळ नवरी बोयी या डोंगररांगेतील एक व पनवेलच्या प्रभागमंडळाचे मानकरी असणाऱ्या कर्नाळा, प्रबळगड, इरशाळगड, माणिकगड, पेब, माथेरान आणि अशा कितीतरी गडांपैकी एक म्हणजे चंदेरी होय. चंदेरीच्या पायथ्याशी असलेली घनदाट वृक्षराजी, गवताळ घसरडी वाट अन मुरमाड निसरडा कातळमाथा म्हणजे सह्याद्रीतील एक बेजोड असा हा कठीण परिसर आहे. तामसाई गावाच्या हद्दीत असणारा असा हा दुर्ग प्रस्तरारोहण कलेची आवड असणाऱ्या गिर्यारोहकांचे खास आकर्षण आहे.

इतिहास : खरे तर रायगड जिल्ह्याचे दुर्गभूषण शोभणारा हा किल्ला असूनही तसे नाव घेण्याजोगे इथे काही घडले नाही. किल्ल्यावरील गुहेच्या अलिकडे एक पडक्या अवस्थेतील शेष तटबंदी दिसते. किल्लेपणाची हीच काय ती खूण. मे १६५६ मध्ये शिवरायांनी कल्याण भिवंडी-रायरी पर्यंतचा सारा मुलुख घेतला. तेव्हा त्यात हा गडही मराठ्यांच्या ताब्यात आला अल्प विस्तार, पाण्याची कमी साठवणूक, बांधकामाचा अभाव मर्यादित लोकांची मुक्कामाची सोय. अतिशय अवघड वाट हे सारे पाहून हा किल्ला नसून एक लष्करी चौकी असेच वाटते. काही जणांच्या मते ७ ऑक्टोबर १९५७ रोजी चंदेरी किल्ल्याच्या सुळक्यावर संघटित प्रस्तरारोहणाचा प्रारंभ झाला.

गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे 

गुहेत पूर्वी एक शिवलिंग व नंदी होता. शिवपिंड भंगलेल्या अवस्थेत आहे. तर नंदीचे अपहरण झाले आहे. गुहेच्या अलीकडेच एक सुमधुर पाण्याचे टाके आहे ऑक्टोबर शेवटपर्यंतच त्यात पाणी असते. ८ ते १० जणांच्या मुक्कामासाठी गुहा उत्तम आहे.

गुहेच्या थोडे पुढे सुळक्याच्या पायथ्याशी देखील एक टाके आहे. कातळमाथ्याचा विस्तार फक्त लांबी पुरताच आहे. सुळक्यावरून उगवतीला माथेरान, पेब, रबळची डोंगररांग इ. दिसते. तर मावळतीला भीमाशंकरचे पठार, सिद्धगड, गोरक्षगड, पेठचा किल्ला इ. दिसतात. गडाच्या पायथ्याचा परीसर पावसाळ्यात फारच रमणीय व विलोभनीय असतो. धबधब्याचा आस्वाद घ्यायला अनेक पर्यटक येथे येतात.

गडावर जाण्याच्या वाटा : मुंबई-कर्जत लोहमार्गवरील ‘वांगणी’ या रेल्वे स्थानकावर उतरावे. तेथून लोहमार्गाच्या कडेकडेने (बदलापूरच्या दिशेस) जाणाऱ्या वाटेने गोरेगाव गाठावे. मुख्य रस्त्यावरून डावीकडे जाणारी वाट (कच्ची सडक) चिंचोली या पयथ्याच्या गावी घेऊन जाते. बदलापूर स्थानकात उतरून चिंचोलीस साधारण पाऊण तासाची पायपीट करूनही पोहचता येते. (वांगणी स्थानकातून गोरेगाव पर्यंत जाण्यास भाड्याची वाहनेही मिळतात.) चिंचोली गावास उजवीकडे ठेऊन वर जाणाऱ्या दोन वाटा आहेत. एका लहानशा टेकाडाच्या दोन बाजूंनी ह्या वाटा जातात.

गुहेत ६ ते १० जणांची राहण्याची सोय आहे. पाण्याची सोय ऑक्टोबर शेवटपर्यंत पावसावर अवलंबून असते. तसेच टाक्यांत पाणी असते. चिंचोली गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी दीड तासांचा वेळ लागतो.

- भूषण दुनबळे,
(८३०८२६८७२६)
bhushandunbale111@gmail.com

चाकणचा किल्ला

पुणे-नाशिक मार्गावर असलेला चाकणचा भुईकोट किल्ला ऊर्फ संग्रामगड हा फिरंगोजी नरसाळा या किल्लेदाराने बलाढ्य मोगली सेनेसमोर सलग ५५ दिवस लढवल्यामुळे शिवचरीत्रात प्रसिद्ध आहे. प्राचीनकाळी चाकण हे घाटमाथ्यावरील व्यापारी केंद्र होते. त्याच्या रक्षणासाठी चाकणचा भुइकोट बांधण्यात आला. या किल्ल्यावरुन घोटण, पौड या मावळांवर आणि घोडनेर, भीमनेर या नेरांवर नजर ठेवता येत असे. 

इतिहास :

चाकणचा भुईकोट किल्ला हा प्राचीन किल्ला आहे. अनेक ऐतिहासिक प्रसंगांना साक्षी असलेल्या या किल्ल्यांचा ताबा देवगिरीच्या यादवांचा पाडाव झाल्यावर अल्लाउद्दीन खिलजीकडे गेला. त्यानंतर अल्लाउद्दीनशहा बहामनीने घाटमाथा व कोकणपट्टीवर कब्जा करण्याचे निश्चित केले. ही कामगिरी मलिक उत्तुजारवर सोपवण्यात आली. त्याने चाकण येथे आपले प्रमुख ठाणे केले (१४५३). या मोहिमेत विशालगडावर स्वारी करण्यासाठी निघालेल्या मलिक उत्तुजारच्या सेनेला शिर्के व मोरे यांनी फसवून त्यांच्यावर या मोक्याच्या जागी अचानक हल्ला करुन मलिक उत्तुजार सह २५०० जणांची कत्तल केली.

शिवाजी राजांचे पणजोबांचे (बाबाजी), वडील मालोजी व खेळोजी यांना दौलताबादचा सुभेदार अमिरशा याने चाकण चौऱ्यांशी परगण्याची जहागिरी दिली होती. पुढे चाकण प्रांत शहाजीराजांच्या जहांगिरीत होता. शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला, त्यावेळी फिरंगोजी नरसाळा किल्लेदार होता. त्याने राजांशी निष्ठा व्यक्त केली व राजांनी त्याचीच किल्लेदार म्हणून नेमणून केली.

२१ जून १६६० रोजी शाहिस्तेखानाच्या २० हजार फौजेने चाकणच्या भुइकोटला वेढा घातला. त्यावेळी किल्ल्यात ६०० ते ७०० मराठे होते, धनधान्य व दारुसाठा पुष्कळ होता. मराठ्यांनी तोफा, बंदुकी व रात्रीचे मोगल सैन्यावर छापे घालून किल्ला भांडता ठेवला. दिवसामागून दिवस उलटले तरी किल्ला पडत नाही हे पाहून शाहिस्तेखानाने ईशान्येकडील बुरुजापर्यंत भुयार खोदले. वेढ्याचा ५५ वा दिवस १४ ऑगस्ट १६६०, या दिवशी भुयारात दारु भरुन बत्ती देण्यात आली. १५ ऑगस्ट १६६० रोजी मोगलांनी निकराचा हल्ला केला. मराठे बालेकिल्ल्याच्या आश्रयाने लढले, पण मराठ्यांचे बळ व सामग्री संपत आली होती. त्यामुळे त्यांनी किल्ला मोगलांच्या ताब्यात दिला.

पाहण्‍याची ठिकाणे : 

चाकणचा किल्ला भुईकोट प्रकारात येत असून कालौघात किल्ल्याची पडझड झाली असून फारसे अवशेष बघायला मिळत नाहीत. चाकणचा किल्ला पूर्व पश्चिम असा असून पूर्वेकडून आपण किल्ल्यात प्रवेश करतो. प्रवेश करतांना खंदक आणि तटबंदी पाहायला मिळते त्यावरून किल्ल्याची सुरक्षा चोख असावी असे कळते. किल्ल्याची तटबंदी उंच असून दगड आणि विटांचे बांधकाम आढळून येतं. प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला देवडी आहे. प्रवेशद्वार पाहून सरळ किल्ल्यात गेल्यास श्री दामोदर विष्णू मंदिर बांधलेले दिसते आणि मंदिराच्या दोन्ही बाजूला तोफा ठेवलेल्या असून बाजूला कातळात कोरलेली ३ शिल्पे पाहायला मिळतात आणि मंदिराच्या विरुद्ध दिशेला एक तोफ ठेवलेली दिसते त्याच्याच बाजूला मशिद आहे. मंदिर आणि मशिद अलिकडच्या काळातील बांधणीचे असावे. तिथूनच किल्ल्याच्या बुरुजावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. किल्ल्याच्या तटबंदीवरून किल्ल्याचा संपूर्ण परिसर न्ह्याहाळता येतो. किल्ल्याची दुरुस्ती सिमेंट वापरून करण्याचा प्रयत्न केला असावा असा तटबंदीवरील कामावरून अंदाज लावता येतो. तटबंदीवर बंदुका डागण्यासाठी आजूबाजूला सलग ५ ते ६ खोबण्या केलेल्या दिसतात. तटबंदीवरून ३ बुरुज स्पष्टपणे पाहता येतात. अतिक्रमणामुळे आणि अनधिकृत बांधकामामुळे किल्ल्यातून जाण्या येण्याचा सिमेंटचा रस्ता बांधण्यात आला आहे.

पोहोचण्याच्या वाटा : 

मुंबई - तळेगाव - चाकण या मार्गाने चाकणला जाता येते. चाकण बस स्थानकापासून उजव्या हाताला गेल्यास मराठी प्रशाले समोरून प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यास किल्ल्याच्या मागच्या बाजूने आपला प्रवेश होतो. इंदुरीचा किल्ल्यापासून चाकणचा किल्ला १५ किलोमीटर अंतरावर आहे.

- भूषण दुनबळे(८३०८२६८७२६)
bhushandunbale111@gmail.com

कन्हेर गड

कन्हेरगड किल्ल्याची उंची 660 मीटर असून तो गिरीदुर्ग प्रकारातील किल्ला आहे. सह्याद्री पर्वताच्या रांगेत असलेला हा किल्ला चढाईसाठी मध्यम स्वरुपाचा आहे. त्यामुळे तरुणांबरोबर मुले, महिलाही येथे सहज जाऊ शकतात. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव रेल्वे स्टेशनपासून 18 किलोमीटर अंतरावर कन्हेरगड हा किल्ला आहे.

या इतिहासदुर्गाची उभारणी आठव्या शतकात झाली. येथे यादव सम्राट आणि त्यांच्या मांडलिकांचे राज्य होते. शके 1150 मधील आषाढी अमावास्या व सूर्यग्रहण असलेल्या दिवशी पाटणादेवीचे मंदिर जनतेसाठी खुले केल्याचा उल्लेख संत जनार्दन चरित्रात आहे. या मंदिराच्या परिसरात खगोलशास्त्रज्ञ व गणितसूर्य भास्कराचार्यानी शून्याची संकल्पना मांडली आहे. त्याच्या वास्तावासंबधीचा शिलालेख येथे आढळून येतो. हा परिसर अतिशय नयनरम्य व मनमोहक निसर्गसौंदर्याने बहरलेला आहे.

चाळीसगाव हे तालुक्याचे ठिकाण असून पाटणादेवी येथे येण्यासाठी मध्य रेल्वेने सहजपणे पोहचू शकतात. चाळीसगाव बसस्थानकावरुन दर तासाला पाटणादेवी या पर्यटनस्थळी जाण्यासाठी एसटी उपलब्ध आहे. सकाळी साडेसहा वाजेपासून बससेवा आहे. बसने पाटणादेवी स्थानकाच्या दिड किलोमीटर अलिकडे महादेव मंदिर थांब्यावर कन्हेर गडासाठी उतरावे लागते. डाव्या हाताच्या खडकाळ पायवाटेने दहा मिनिटात मंदिरात जाता येते. मंदिराच्या मागून पंधरा मिनिटे चालल्यावर एक सिंमेटमध्ये बांधलेली मेघडंबरी येते. तेथून डाव्या हाताने जाणाऱ्‍या पायवाटेने कन्हेरगडचा डोंगर चढायला सुरुवात करावी. कन्हेर गडावर जाण्यासाठी असलेला प्रवेशद्वार आजही सुस्थितीत आहे. वाटेत दगडी पायऱ्‍या ही लागतात. पुढे दहा मिनिटात पायवाट उजवीकडे वळते आणि नागार्जुन गुंफापाशी पोचतो. उजवीकडे वळणाऱ्‍या वाटेवर शृंगारचौरी लेणी आणि डावीकडे वळणाऱ्‍या वाटेवरचा दगडी कातळ चढली की कन्हेरगडाची माची लागते. तिथून पुढे जात राहिले की गडाच्या माथ्यावर पोहोचता येते.

पाहण्यासारखी ठिकाणे :

हेमांडपती महादेव मंदिर 

उंच चौथऱ्‍यावर काळ्या दगडांनी बांधलेल्या ह्या पूर्वेकडे तोंड असलेल्या सुंदर मंदिराच्या चारी बाजूने अनेक मूर्ती कोरल्या आहेत. मंदिराच्या गर्भगृहाच्या दरवाज्यावर गणेशपट्टी आणि सप्तमातृका आहेत. मंदिराचा सभामंडप आणि तेथील एक शिलालेख पाहाण्यासारखा आहे. हे मंदिर भारतीय पुरातन खात्याने संरक्षित म्हणून जाहीर केले आहे.

मेघडंबरी नागार्जुन गुंफा

या गुंफा इसवी सनाच्या नवव्या शतकात कोरलेल्या आहेत. येथे तीन दालने नक्षीकाम केलेले खांब, इंद्राची प्रतिमा, महावीराची एक व अन्य तीर्थकरांच्या मूर्ती आणि त्याच्यावर चवरी ढाळणाऱ्‍या सेवकाची एक मूर्ती आहे.

सीतेची न्हाणी लेणी

लेण्यांची ओवरी 18 फुट रुंदीची असून दोन्ही बाजूला साधे खांब आहेत. येथे प्रभू रामचंद्र येऊन गेले होते अशी आख्यायिका ऐकायला मिळते.

शृगांरचौरी लेणी

ही अकराव्या शतकातली हिंदू पद्धतीची लेणी आहेत. लेणी पाच खांब्यावर उभी असून आत काही शृंगारिक चित्रे कोरलेली आहेत.

पाटणादेवी मंदिराच्या परिसरात राहण्यासाठी वनखात्याच्या वतीने भक्त निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. चहा, नास्त्यासाठी स्थानिकांची दुकाने आहेत. सर्व लेणी, पुरातन मंदिरे आणि आसपासची सर्व ठिकाणे पाहण्यासाठी पाटणादेवीला दोन दिवसांचा मुक्काम करावा लागतो.

- निलेश परदेशी
चाळीसगाव, जि.जळगाव

किल्ले सेगवा

महाराष्ट्र गुजरातच्या सीमेजवळ सेगवा आणि बल्लाळगड हे दोन किल्ले आहेत. पालघर जिल्ह्यात आणि तलासरी तालुक्यात, मुंबई - अहमदाबाद महामार्गाच्या जवळ असूनही हे किल्ले तसे दुर्लक्षित आहेत. ११ व्या शतकात बांधल्या गेलेल्या आणि शिवकाळात पुनर्बांधणी झालेल्या सेगवा किल्ल्यावर अनेक अवशेष काळाची झुंज देत आजही उभे आहेत. या भागात असणाऱ्या इतर किल्ल्यांच्या मानाने (असावा, अशेरीगड इत्यादी) सेगवागडाची उंची पायथ्याच्या करंजविरा गावापासून कमी असल्याने २ ते ३ तासात सहज पाहून होतो. सेगवा आणि बल्लाळगड हे दोनही किल्ले एका दिवसात पाहून होतात. ऐतिहासिक कागदपत्रात सेगवा गडाचा उल्लेख सेगवाह या नावानेही येतो. 

केळवे माहिमचे मूळ नाव मत्स्यमत्‌, त्याचे पुढे झाले महकावती व नंतरच्या काळात माहिम. प्राचिनकाळी प्रतापबिंब राजाने दमणपासून वाळुकेश्वरापर्यंतच्या (आजची मुंबई) समुद्र किनाऱ्यावर आपले राज्य स्थापन करुन त्याची राजधानी म्हणून महिकावतीची निवड केली. त्याच काळात सेगवा किंवा सेगवाह किल्ला बांधण्यात आला. १४ व्या शतकात गुजरातच्या सुलतानाने हा परीसर ताब्यात घेतला तेव्हा हा गडही त्याचा ताब्यात गेला. पुढील काळात या भागावर रामनगरच्या कोळी राजांचे अधिपत्य होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स. १६७२ ते १६७७ या काळात मोरोपंताना ६००० ची फौज देऊन उत्तर कोकणात पाठवले. इ.स. १६७७ ला रामनगरच्या कोळी राजाच्या ताब्यात असलेला प्रांत महाराजांच्या अधिपत्याखाली आला. त्याच काळात सेगवा किल्ला स्वराज्यात दाखल झाला.

इ.स. १६८३ पासून पुढील ६६ वर्षे हा किल्ला पोर्तुगीज आणि रामनगर यांच्याकडे होता. चिमाजी आप्पानी काढलेल्या वसई मोहिमेत इ.स. १७३९ मध्ये कृष्णाजी महादेव चासकर यानी सेगवागड जिंकुन घेतला. पुन्हा इ.स. १७५४ मध्ये हा किल्ला रामनगरच्या कोळी राजाकडे गेला. इ.स. १८०२ मध्ये झालेल्या तहात सेगवा किल्ला पेशव्यांकडे आला. इ.स. १८१७ मधे गोगार्डच्या अधिपत्या खालील सैन्याने सेगवागड जिंकला.

पाहण्याची ठिकाणे : करंजविरा गावातून आपण पाऊण तासात गडाच्या माचीवर वायव्य दिशेकडून प्रवेश करतो. माची दक्षिणोत्तर पसरलेली आहे. येथुन उजवीकडे (दक्षिणेकडे) गेल्यास माचीचे टोक आहे. तर डावीकडे (उत्तरेकडे) बालेकिल्ला आहे. प्रथम माचीच्या टोकाकडे जावे. तेथुन खालचे करंजविरा गाव, मुंबई - अहमदाबाद हायवे आणि महालक्ष्मीचा सुळका पाहाता येतो. माचीच्या टोकावरुन परत किल्ल्यावर प्रवेश केला त्या ठिकाणी येऊन बालेकिल्ल्याकडे चालायला सुरुवात केल्यावर डाव्या बाजुला हनुमानाचे नविन मंदिर व त्यातील हनुमानाची संगमरवरी मूर्ती पाहाता येते. कारण हा किल्ला शिवाजी महाराजानी जिंकुन त्याची पुनर्बांधणी केली होती. हनुमान मंदिरावरुन पुढे जाताना माचीच्या दोनही बाजुस उतारावर तटबंदीचे अवशेष पाहायला मिळतात. त्यात चुना भरला जाई. यामुळे दगड एकमेकात अडकून राहात, तसेच बाहेरच्या बाजूंनी तटबंदी दिसतांना अखंड दगडाची दिसे. तीव्र उतारावर बांधलेल्या तटबंदीचे आज मोजकेच अवशेष गडावर पाहायला मिळतात.

गडाच्या माचीवर महादेवाचे मंदिर आहे. स्वच्छ सारवलेल्या आणि पत्र्याने शाकारलेल्या या मंदिरात पिंड, नंदी, कासव आणि गणेशाची मूर्ती आहे. येथे पुजेचे पाणी भरुन ठेवण्यासाठी दगडात कोरलेली एक ढोणी पाहायला मिळते. माची आणि बालेकिल्ल्याच्या डोंगरामध्ये एक घळ आहे. या घळीत उतरून बालेकिल्ल्यावर चढताना बालेकिल्ल्याच्या तटबंदीचे अवशेष पाहायला मिळतात. बालेकिल्ल्याच्या प्रवेशद्वारा समोर असलेल्या पायऱ्या चढुन पश्चिमाभिमुखी उद्ध्वस्त प्रवेशद्वारातून आपला बालेकिल्ल्यावर प्रवेश होतो. येथुन दोन वाटा फुटतात. सरळ वर चढत जाणारी वाट किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्याकडे जाते. दुसरी उजव्या बाजूने जाणारी वाट पाण्यांच्या टाक्यांकडे जाते. आपण उजव्या बाजूच्या वाटेने चालायला सुरुवात केल्यावर उजव्या बाजूला दरीच्या बाजूला तटबंदीचे काही अवशेष पाहायला मिळतात. पुढे एक घळ लागते. या जागी पूर्वी किल्ल्याचा दक्षिणाभिमुख दरवाजा होता आता तो पूर्णपणे कोसळलाय. त्याचे दरीत पसरलेले दगड येथे पाहायला मिळतात.

पोहोचण्याच्या वाटा : करंजविरा हे सेगवागडाच्या पायथ्याचे गाव आहे. तेथे जाण्यासाठी मुंबई - अहमदाबाद महामार्गावरील १११ किमी वरील चारोटी नाका गाठावा. त्यापुढे अंदाजे ४ किमीवर महालक्ष्मीचे प्रसिद्ध मंदिर आहे. महालक्ष्मीच्या पुढे ११ किमीवर (मुंबई पासून १२५ किमीवर) आंबिवली गाव आहे. उजवीकडे जाणारा रस्ता करंजविरा गावात जातो. गावातील शाळेपर्यंत खाजगी वाहनाने जाता येते. रेल्वेने डहाणू आणि तलासरी येथे उतरून स्टेशन बाहेर मिळणाऱ्या खाजगी जीप/ओमनी या वाहनांनी आंबिवली किंवा करंजविरा फाट्यावर उतरावे. तेथुन चालत अर्ध्या तासात आपण गावातील शाळेजवळ पोहोचतो.

करंजविरा गावाच्या मागे सेगवागड आहे. गावातून पुढे जाणारा रस्ता संपला की शेतातून जाणारी पायवाट आपल्याला गडाच्या डोंगराच्या डाव्या बाजूच्या धारेखाली आणून सोडते. तेथुन मळलेल्या पायवाटेन पाऊण तासात खडा चढ चढून आपण माचीवर पोहोचतो.

- भूषण दुनबळे,
८३०८२६८७२६
bhushandunbale111@gmail.com