खरेतर राजगडाचे रूप कायम चिरतरुण, लोभस. कुठल्याही ऋतूत पाहावे असे. त्याच्या पहिल्या दर्शनातच तो प्रेमात पाडतो. पण त्यातूनही वर्षां ऋतूने भाद्रपदात प्रवेश केला की हिरवाईत बुडालेला हा गड सोनकी-तेरडय़ाच्या रानफुलांनी जणू नव्या नवरीप्रमाणे सजू पाहतो. पाऊस, ढग-धुके आणि हिरवाई-रानफुलांचा सहवास हे सर्व राजगडाचा प्रत्येक कोन, दृश्य बदलून टाकते. वास्तूंचे रूप खुलते. तेव्हा अशा वर्षांकाळी एकदा तरी या गडावर यावे आणि त्याचे होऊन जावे.
पुणे-बंगलोर महामार्गावर पुणे जिल्हय़ातील नसरापूरहून एक फाटा वेल्हय़ाकडे वळतो. या मार्गावरच मार्गासनी हे गाव लागते. या गावातूनच साखर, गुंजवणे, वाजेघर, पाली आणि भूतोंडे गावाकडे एक वाट जाते. या सर्व गावांच्या बरोबर मध्यभागी डोईवरच साऱ्या मुलखावर नजर ठेवून हा ढाण्या वाघ कधीचा ठाण मांडून बसला आहे. त्याला भेटायचे असेल तर वर उल्लेख केलेल्या कुठल्याही गावच्या रहाळात जायचे आणि तिथून वर निघणाऱ्या वाट-आडवाटेने गड गाठायचा. गुंजवण्यातून गुंजण दरवाजाने, साखरमधून चोरदिंडीने, वाजेघर-पालीतून पाली दरवाजाने आणि भूतोंडेतून अळू दरवाजाने गडात शिरता येते. यातली पाली दरवाजाची वाट तेवढी सामान्यांसाठी, अन्य वाटा डोंगरदऱ्यात संसार मांडणाऱ्यांच्या!
पालीकडून येणारा गडाचा राजमार्ग! पायथ्याच्या पाल ऊर्फ पाली गावातही राजवाडा होता. त्याचे अवशेष आजही दिसतात. या गावातच गडाचे मुख्य हवालदार भोसले कुटुंबीयांचेही वंशज राहतात. या पाली मार्गाने गडावर निघालो की तासा-दोन तासांत आपण पाली दरवाजात हजर होतो.
चौदाशे मीटर उंचीचा हा डोंगर मूळ मुरुंबदेवाचा म्हणून ओळखला जाई. हा मुरुंबदेव बहुधा ब्रह्मदेवाचा अपभ्रंश असावा! यासाठी दाखला म्हणून गडावरील ब्रह्मर्षी ऊर्फ ब्रrोश्वराचे मंदिर दाखवले जाते. अनेकदा अपभ्रंश उच्चारातही एक ग्रामीण लडिवाळ वाटतो. दरम्यान, स्वराज्य स्थापनेच्या काळात शिवरायांना तोरणा गडावर काही धनसंपत्ती प्राप्त झाली आणि याचाच उपयोग स्वराज्यासाठी करत त्यांनी शेजारच्या या मुरुंबदेवाच्या डोंगरावर एक बुलंद गड आकारास आणला.
एक उंच पर्वत, ज्याला बलदंड अशा तीन भुजा आणि मधोमध एक पुन्हा कातळ पर्वत! राजगडाचा हा मूळ भूगोल! नैसर्गिकदृष्टय़ा अभेद्यपण असलेल्या या पर्वतावर शिवरायांनी त्यांच्या राजधानीचा संकल्प सोडला. डोंगराच्या तीन सोंडांवर पद्मावती, सुवेळा आणि संजीवनी या तीन अभेद्य माच्या तयार झाल्या. या माच्यांच्या मधोमध असलेल्या एका कातळ पर्वतावर बालेकिल्ला उभा राहिला आणि पाहता पाहता स्वराज्याची राजधानी थाटली, राजगड!
हा सारा देखावा आकाशातून पाहू गेलो तर तो एखाद्या पंख पसरलेल्या पक्ष्याप्रमाणे भासतो. स्वराज्याच्या राजधानीचे हे जणू बलदंड बाहूच! गडाच्या मध्यावरच्या सपाटी आणि हाराकिरीच्या जागेला तटबंदीचे शेलापागोटे चढवले की ती होते माची. अनेक गडांना ही माची दिसते. राजगडाचे नशीब याबाबतीत थोडे थोर; ज्यातून या गडाला पद्मावती, संजीवनी आणि
मुघलांच्या आक्रमणावेळी या माच्यांनीच अगोदर हा गड लढवला. याबाबत मुस्तैदखान म्हणतो, ‘राजगडाभोवतीच्या या माच्या म्हणजे तीन स्वतंत्र किल्ले आहेत. त्यांच्या भक्कम तटबंदीमुळे हा किल्ला जिंकणे अशक्य आहे. तटाच्या खाली भयंकर दऱ्या आहेत. त्यांच्याकडे जाणाऱ्या वाटा अतिशय अवघड आहेत.’
राजगडाची इतिहासातील ही अशी वर्णने वाचावीत आणि त्याचे दडपण घेतच गडावर दाखल व्हावे. गडावर येणाऱ्या बहुतेक वाटा यातील पद्मावती माचीवर दाखल होतात. यातल्याच पालीमार्गे महादरवाजात यावे. पाली दरवाजा! एकाखाली एक अशा दोन कमानी असलेले हे गडाचे महाद्वार. अन्यत्र असणाऱ्या चौक्या-पहारे असे सारे काही या बांधकामात, पण त्याहीपेक्षा गडाचा दरवाजा पर्वताला समांतर बांधत दडवून ठेवण्याचे ‘गोमुखी’ शिवदुर्गविज्ञानही इथे सामावलेले.
पद्मावती माचीवर बऱ्यापैकी सपाटी असल्याने इथे शिवकाळात मोठी वहिवाट होती. राजांचा राहता वाडा, हवालदार-किल्लेदाराचे वाडे, शिबंदीची घरे, रत्नशाळा, सदर, पद्मावती-रामेश्वराचे मंदिर, सईबाईंची समाधी, पद्मावती तलाव व अन्य तळी, धान्याची कोठारे, दारूगोळय़ाचे कोठार, चोरदिंडी, गुंजण दरवाजा या साऱ्यांमधून ही माची बराच इतिहास सांगते-दाखवते!
यातील प्रत्येक वास्तूच नाहीतर सगळा राजगडच खरेतर शिवरायांचा पदस्पर्श-सहवास अनुभवलेला, त्यामुळे इथला दगड नि दगड देवघरातील एखादा टाक वाटावा. पण या खऱ्याखुऱ्या शिवसृष्टीचे जतन करणे तर दूरच, पण आमच्या नतद्रष्टेपणामुळे अनेकांनी वाट लावली आहे. यातील सदरेचेच एक उदाहरण पाहूयात. भोर संस्थानच्या ताब्यातून भारत सरकारकडे हस्तांतर होताना ही सदर छतासह सुस्थितीत होती. त्या वास्तूत छत्रपती शिवराय जिथे बसत त्या जागी लोड-तक्के ठेवून पूजा करत रोजचा कारभार केला जाई. स्वातंत्र्यवर्षांच्या या कालखंडातच ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. ग. ह. खरे यांनी लिहिलेल्या ‘स्वराज्यातील तीन दुर्ग’ या पुस्तकात सुरुदार नक्षीचे खांब, भिंती, कोनाडे असलेल्या या सदरेचे एक दुर्मिळ छायाचित्र प्रसिद्ध केले आहे. त्याच वेळी या सदरेची दुरवस्था होऊ लागल्याचे त्यांनी म्हटले आहे. पुढे १९६०च्या दशकात ज्येष्ठ दुर्गअभ्यासक आणि साहित्यिक यांनी राजगडाच्या काढलेल्या छायाचित्रांत या सदरेच्या जागी केवळ एक खांब उभा असलेला दिसत आहे. त्यांच्या या छायाचित्रसंग्रहात या सदरेपुढे एक बांधीव ओटाही दिसतो. पुढील दहा-वीस वर्षांत हा खांब आणि ओटाही गायब झाला. यानंतर पुढील अनेक वर्षे या सदरेच्या जोत्याचे तळखडे दिसत होते. पण गेल्या पाच-दहा वर्षांत जीर्णोद्धाराच्या
ऐतिहासिक वास्तूंच्या पडझडीस निसर्ग किती जबाबदार आणि मानवाचे करंटे हात किती जबाबदार?
असो! पद्मावती मंदिरात आपला संसार उतरवावा आणि पश्चिमेकडील संजीवनीकडे वळावे. तीन टप्प्यांत उतरणारी संजीवनी माची तब्बल दीड ते दोन किलोमीटर लांब पसरलेली आहे. या दरम्यानच्या तटात तब्बल १९ बुरूज येतात. सामान्यत: कुठल्याही गडकोटांना तटबंदीचा एकच पदर असतो. पण राजगडावरील सुवेळा आणि संजीवनीच्या या तटास बाहेरून आणखी एक चिलखत चढवले आहे. या एकात एक असलेल्या बुरुजांमध्ये ये-जा करण्यासाठी भुयारी मार्ग ठेवलेले आहेत. माचीच्या आतील मोकळय़ा जागेत घरांचे काही अवशेष दिसतात. त्यांच्यासाठी टाक्या खोदत पाण्याचीही जागोजागी सोय केलेली आहे. वर-खाली, सर्पाकार होत धावणारी दुहेरी तटबंदीची ही माची दूरवरून एखादी सळसळती नागीणच वाटते. गडकोटांचे हेच गूढ घेऊन या माचीवर उतरावे, दुहेरी तटांमधील नाळेतून भय घेत फिरावे.. बुरुजांमध्ये उतरणारे दिंडी दरवाजे, तोफेच्या कमानी, माऱ्याच्या जंग्या आणि वन्यप्राण्यांची शिल्पे हे सारे आपल्याकडे रोखून पाहत असतात.. संजीवनीचे हे अद्भुत दर्शन अंगी शिवकाळाचा ज्वर चढवते. तो अंगी घ्यावा आणि पूर्वेच्या सुवेळा माचीवर उतरावे.
गडाची ही धाकटी माची. पूर्वेकडे तोंड केलेली, सु वेळी खुलणारी म्हणून सुवेळा! तिच्यात पोहोचण्यापूर्वीच एका डुब्यावर तानाजी मालुसरे, येसाजी कंक आणि शिळीमकर या सरदारांची उद्ध्वस्त घरटी त्यांच्या कथा ऐकवतात. यांच्यापुढे मजबूत बांध्याचा झुंजार बुरूज लागतो. तो पाहत लगतच्या एका दिंडीदरवाजाने सुवेळावर उतरायचे. इथे तटातच एका घुमटीतील गणेश कैक सालापासून या परिसरावर श्रद्धा ठेवून आहे.
सुवेळाच्या मधोमध एक कातळ उभा ठाकला आहे. समोरून त्याचा आकार एखाद्या हत्तीसारखा वाटतो. या कातळाच्या पोटात शे-पन्नास माणूस बसू शकेल असे आरपार पडलेले छिद्र आहे. या भौगोलिक आविष्कारास कोणी ‘नेढे’ म्हणतात, तर
बेलाग बालेकिल्ला
चिलखती बांधणीच्या माच्यांप्रमाणेच अभेद्य बालेकिल्ला हेही राजगडाचे वैभव! सात-आठशे फूट उंच, चहूबाजूंनी तुटलेले कडे अशा या बालेकिल्ल्याबद्दल पं. महादेवशास्त्री जोशी लिहितात- ‘..साडेचार हजार फूट उंचीला भिडणारा हा खडक म्हणजे ‘शुद्ध दगड’ आहे. मेघ शिळधारी वर्षतात, पण तिथे तृणबीजही उगवत नाही, मग झाडे-झुडपे कुठली! तो पावसात भिजतो, वाऱ्यावर सुकतो आणि उन्हात तापतो, जणू युगायुगांचा उभा अनिकेत तपस्वीच!’
सुवेळा आणि पद्मावतीच्या मधूनच या बालेकिल्ल्यावर वाट निघते. निघते म्हणजे, कडय़ावर चढते. खोबण्या तयार करत केलेल्या या वाटेवर पाय रोवत आणि शरीर वर सरकवत चढावे लागते. पण एवढे कष्ट करत वर आलो की दिसणारे महाद्वार सारे कष्ट तिथल्या तिथे फेडून टाकते. दरवाजाचे हे शिल्प म्हणजे एक सुरेख कोंदण! भल्या सकाळी सूर्योदयाच्या वेळी इथे यावे आणि या कोंदणातून पूर्वेकडचा दिसणारा देखावा आयुष्यभराची एक आठवण म्हणून मनी साठवावा. ..समोर सुवेळाचा लयबद्ध आविष्कार, उजवीकडचे भाटघर धरणाचे पात्र, नुकतीच उठू पाहणारी छोटी खेडी, धुक्यात उलगडत जाणाऱ्या
वर आलो की चहू दिशांचे सिंहगड, पुरंदर-वज्रगड, रोहिडा, रायरेश्वर-कोळेश्वरचे पठार, त्यामागचा कमळगड, पाचगणी-महाबळेश्वर, प्रतापगड-मकरंदगड, पश्चिम अंगाचा लिंगाणा, त्यामागचा रायगड आणि अगदी हातावरचा राजगडाचा धाकटा भाऊ तोरणा असे बरेच मोठे ‘स्वराज्य’ दिसू लागते. खुद्द बालेकिल्ल्यावर जननी, ब्रह्मर्षीचे मंदिर, राजांचा राहता वाडा, अंबरखाना, तळी अन्य घरांचे अवशेष दिसतात. हा सारा परिसर आणि हे अवशेष पाहिले की शिवकाळाची गुंगी चढते. मग राजगडही बोलू लागतो.
..इसवी सन १६४८ ते १६७२. तब्बल पंचवीस वर्षे महाराजांनी इथे वास्तव्य केले. शिवरायांच्या सहवासाचे सर्वाधिक भाग्य राजगडाएवढे अन्य कुणालाही मिळाले नसेल. अनेकदा वाटते महाराजांचे हे वास्तव्य राजगडाच्या अभेद्यपणातून होते की त्याच्यावरील प्रेमातून!..त्यांच्या या वास्तव्यात या गडाने छत्रपती राजारामांचा जन्म अनुभवला, तसाच सईबाईंचा मृत्यूही सोसला. अफझलखानाच्या वधासाठी महाराज याच गडावरून बाहेर पडले आणि आग्रा येथील औरंगजेबाच्या कैदेतून सुटका झाल्यावर त्यांनी पहिले पाऊलही राजगडावरच टाकले.
असा हा राजांचा गड आणि गडांचा राजा- राजगड! शरीराने आता थकला आहे, मनाने भागला आहे. पण तरी आजही त्याच्या या अंगणी आलो की या थरथरत्या शरीरातही नवचैतन्य संचारते. मग आलेल्या प्रत्येकाला तो पुन्हा शिवकाळात घेऊन जातो आणि शिवभारताची कथा ऐकवतो!